म. ए. सो. साठी एक विशेष गौरव
१९७५ साली केंद्रशासनाने दिव्यांगांना अव्यंग मुलांबरोबर शिक्षणाची समान संधी देण्याचे ठरवले आणि अपंग एकात्म शिक्षण योजना पुरस्कृत केली. पुण्यामध्ये कर्णबधिरांच्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती मा. मालतीबाई जोशी आणि सुह्रद मंडळ या कर्णबधिरांसाठी विशेष शाळा चालविणाऱ्या संस्थेच्या मा. विजय खरे या दोघींच्या प्रेरणेने या योजनेअंतर्गत कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी अनेक विभाग सुरू करण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे भावे प्राथमिक शाळेत सुरू झालेले पहिले विभाग मा. कै. शैलजा लिमये (त्यावेळच्या मुख्याध्यापिका) यांच्या मार्गदर्शनात आणि प्रोत्साहनात सौ. वष्ट आणि सौ.बापट या दोन्ही शिक्षकांनी या विभागा मधील कर्णबधिर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. विद्यार्थी चौथी उत्तीर्ण झाले आणि आता माध्यमिक शिक्षणाची जिद्द मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये निर्माण झाली होती. म. ए. सो मुलांचे विद्यालयात या मुलांना प्रवेश देऊन हे आव्हान मा. मुख्याध्यापिका सौ. मंगला उकिडवे यांनी समर्थपणे पेलले. पुन्हा एकदा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आपल्या सामाजिक बांधिलकीच्या उद्दिष्टाप्रमाणे या योजनेला सहकार्य देण्यासाठी सिद्ध झाली.
आता या योजनेअंतर्गत कर्णबधिर विद्यार्थी सर्वसामान्य मुलांच्याबरोबर शिकत आहेत आणि शालांत परीक्षेच्या महत्तवपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार करीत आहेत. शाळेत हा विभाग सुरू होण्यला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भावे स्कूलच्या या विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे बहिरेपणाच्या गंभीर अपंगत्वावर मात करत, कोणताही न्यूनगंड येऊ न देता विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रम तर पूर्ण केलाच, पण दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची उमेद बाळगली आणि जिद्दीने पूर्णही केली. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांबरोबरच पालकांच्या परिश्रमाचा आणि शाळेतील सर्वांच्या सहकार्याचा सिंहाचा वाटा होता आणि अजूनही असतो.
आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मा. सौ. उकिडवे बाई आणि त्यानंतरच्या सर्व मुख्याध्यापकांनी बौद्धिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आणि घरात शैक्षणिक वातावरण असलेल्या काही कर्णबधिर मुलांना सेमी इंग्लिश माध्यमाची तुकडी घेण्याची परवानगी दिली. सर्व मुलांनी पालक आणि शिक्षकांच्या मदतीने मिळालेल्या संधीचे सोने केले. यापैकी काही उल्लेखनीय विद्यार्थी असे-प्रसन्न बापट (इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंग. डी. इ. इ), उदय जोशी (डी. एम. इ)विश्वास केतकर(डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी), केयुर पटवर्धन (बी. ई.) कौस्तुभ गाडगीळ (डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ,डी .बी. एम) तसेच रेणुका स्वरूप प्रशालेतील गायत्री इनामदार (जी. डी. आर्ट), करिष्मा जोगळेकर(बी. ई. कॉम्प्युटर) आणि मानसी साळवेंकर(बी. ई. इले) या विद्यार्थिनी, यापैकी करिष्मा जोगळेकर ही तर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अपंग विद्यार्थ्यात पहिली आली.
काही विद्यार्थ्यांनी अभिनव कला महाविद्यालयात जाऊन कमर्शिअल आर्ट किंवा ड्रॉइंगपेंटिंग मधील पदविका संपादन केली तर काही विद्यार्थ्यांनी आपले वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व अजूनही करत आहेत. आतापर्यंत भावे स्कूलमधून १० उत्तीर्ण झालेले हे ७०-७५ विद्यार्थी पुढील शिक्षणानंतर नोकरी करून समाजाला भार न होता आपल्या पायावर ठामपणे उभे आहेत. हे सर्व विद्यार्थी शाळेविषयीची, शाळेतील शिक्षकाविषयीची कृतज्ञता मनात साठवून आहेत.
खरंतर बहिरेपणा हे व्यंग पटकन न समजण्यासारख. दिसायला हातीपायी धड दिसणारी ही मुलं, भाषेअभावी दुसऱ्याशी सहजपणे संपर्क करू शकत नाहीत. जन्मतः ऐकू न येण्यामुळे बोलण्यातही दोष. पुन्हा पुन्हा शब्द कानावर न पडण्यामुळे भाषेचे दृढीकरण होत नाही. अशा गंभीर अडचणीवर मात करत पूर्णपणे भाषाधिष्ठित असलेल्या आपल्या शिक्षणपद्धतीशी जिद्दीने टक्कर देत आहेत. त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी ही अपंग एकात्मशिक्षण योजना वरदानच ठरली आहे.